भिवंडी गुन्हे शाखेचा मोठा दणका; चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश

Satya Nirnaya
0


तीन आरोपी जेरबंद; १० गुन्ह्यांची उकल • १४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व मोटारसायकलसह ₹११.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त • ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर व बीडमधील गुन्ह्यांचा उलगडा

      सत्य निर्णय भिवंडी | प्रतिनिधी

 भिवंडी : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीने जबरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश करत मोठे यश संपादन केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून १४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा एकूण ₹११ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, ठाणे आणि बीड जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

ठाणे शहरात वाढत्या जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान पोलीस शिपाई भावेश घरत आणि विजय कुंभार यांनी आरोपींनी वापरलेली मोटारसायकल शोधून काढली. संबंधित वाहनावर पाळत ठेवण्यात आली असता आरोपी पोलिसांना पाहून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी पोलीस शिपाई सफराज तडवी यांनी सुमारे दोन किलोमीटरपर्यंत आरोपीचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कासिम जाफर हुसेन (वय २६, रा. आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) असे आहे.

कासिम हुसेन याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आणखी तीन साथीदारांच्या मदतीने विविध भागांत चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या चौकशीत सात चेन स्नॅचिंग आणि एका मोटारसायकल चोरीसह एकूण आठ गुन्हे उघडकीस आले.

या टोळीने भिवंडी शहर पोलीस ठाणे (गुन्हा क्र. ४१८/२०२६), बदलापूर पूर्व पोलीस ठाणे (गुन्हा क्र. १२३/२०२६ व १९८/२०२६), खडकपाडा पोलीस ठाणे, कल्याण (गुन्हा क्र. २५२/२०२६), मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली (गुन्हा क्र. ९६६/२०२५ व ११५७/२०२५), कळवा पोलीस ठाणे, ठाणे (गुन्हा क्र. ३७७/२०२६) तसेच श्रीनगर पोलीस ठाणे, ठाणे (गुन्हा क्र. २४/२०२५ – मोटारसायकल चोरी) या ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

पहिल्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाचा वेग कायम ठेवत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दुसऱ्या टोळीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गोविंद लड्डू काळे (वय ३४, रा. परतूर, जि. जालना) आणि गोविंद बापूराव चव्हाण (वय ३२, रा. इंदिरानगर, गणेश चाळ, मुलुंड पूर्व, मुंबई) यांचा सहभाग समोर आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बी. पाटील आणि त्यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जालना जिल्ह्यातील परतूर येथून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून चौकशीदरम्यान नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी (गुन्हा क्र. ५६४/२०२६) आणि माजलगाव पोलीस ठाणे, बीड (गुन्हा क्र. १७०/२०२६) येथील दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले. अशा प्रकारे दोन्ही टोळ्यांकडून एकूण १० गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

या कारवाईत आरोपींकडून १४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा ₹११ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने अनेक पीडितांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपासात आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंग जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सपोनि श्रीराज माळी, सपोनि मिथुन भोईर, पोउनि रविंद्र पाटील, पोउनि रामचंद्र जाधव, सपोनि सुनील साळुंके तसेच निलेश बोरसे, प्रशांत राणे, साबीर शेख, शिवाजी मुतर्डक, वसंत चौरे, राजेश गावडे, प्रकाश पाटील, अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सफराज तडवी, नितीन नंदिवाले आणि संजय चव्हाण या अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चेन स्नॅचिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर मोठा आळा बसला असून ठाणे पोलीस आयुक्तालयाने अशा गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा गुन्ह्यांबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)