मालमत्ता बळकावण्याच्या हव्यासातून शिक्षिकेची निर्घृण हत्या

Satya Nirnaya
0

बनावट मृत्युपत्रावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेत नाक-तोंड दाबून केला खून; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, दोन आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरू 


 सत्य निर्णय ठाणे| प्रतिनिधी

मालमत्ता बळकावण्यासाठी एका अविवाहित शिक्षिकेची अत्यंत थंड डोक्याने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाचा छडा लावत ठाणे गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. शिक्षिकेच्या नावावरील मालमत्ता बळकावण्यासाठी आरोपींनी प्रथम बनावट मृत्युपत्र तयार केले, त्यावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली आणि त्यानंतर नाक व तोंड दाबून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आणखी दोन साथीदारांचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या संगीता मारुती चंदनशिवे (वय ५३ वर्षे) या वेणूबाई पावशे विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या एलआयसी एजंट म्हणूनही काम करत होत्या. अविवाहित असलेल्या संगीता चंदनशिवे या दि. १४ जुलै २०२६ रोजी एलआयसीच्या कामानिमित्त शाहापूर येथे जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्या परत न आल्याने आणि त्यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

त्यांचा कोणताही ठावठिकाणा न लागल्यामुळे त्यांचे भाऊ प्रवीण मारुती चंदनशिवे यांनी दि. १५ जुलै २०२६ रोजी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार मानव मिसिंग क्रमांक १३३/२०२६ नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा, घटक–३ ने समांतर तपास सुरू केला. दरम्यान दि. १६ जुलै २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी मेडिकल कॉलेजसमोरील सिन्नर–घोटी मार्गालगत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासात हा मृतदेह संगीता चंदनशिवे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात बीएनएस–२०२३ मधील कलम १०३(१), २३८ व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण, लोकेशन तपासणी आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. त्यातून दिगंबर भागुजी आव्हाड (वय ४८), रा. आसनगाव आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी (वय ५२), रा. आंबिवली, कल्याण यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी संतोष रमेश जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे यांच्या मदतीने संपूर्ण कट रचला होता. एलआयसी पॉलिसीच्या कामाचे आमिष दाखवून संगीता चंदनशिवे यांना आसनगाव येथे बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना आरोपींनी भाड्याने घेतलेल्या घरात नेले.

याच ठिकाणी त्यांच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावे करण्यासाठी आरोपींनी बनावट मृत्युपत्र तयार केले. त्या मृत्युपत्रात स्वतःची नावे वारसदार म्हणून नमूद करण्यात आली. त्यानंतर संगीता चंदनशिवे यांना मारहाण करून जबरदस्तीने त्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्या. स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर आरोपींनी त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांची हत्या केली.

पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कारमध्ये टाकून नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी मेडिकल कॉलेजसमोरील सिन्नर–घोटी मार्गालगत रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार असलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्ह्यामागील आर्थिक व्यवहार, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर पुराव्यांचा तपासही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध–१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अल्पावधीत या खुनाचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)