महानगर गॅसच्या नावाने बनावट APK फाईल पाठवून नागरिकांच्या मोबाईलमधील बँकिंग माहिती चोरून आर्थिक फसवणूक; देशभरातील २,९९३ नागरिकांना गंडा, महाराष्ट्रातील ५१२ जण बळी. ₹६३ कोटी ६९ लाख ६८ हजार १७४ रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश; आरोपीकडून ९६७ बनावट APK फाईल्स, ३७,२०० नागरिकांचा बँकिंग डेटाबेस, १० मोबाईल, १ लॅपटॉप, ७ सिमकार्ड व ४ क्रेडिट/डेबिट कार्ड जप्त.
सत्य निर्णय मुंबई | प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांच्या दक्षिण परिमंडळ-२ अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याने देशभरात बनावट APK फाईलच्या माध्यमातून सुरू असलेल्या सायबर फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत मुख्य सूत्रधाराला झारखंड राज्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीच्या कारवायांवर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणाची सुरुवात डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीतून झाली. तक्रारदाराला महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने मोबाईलवर एक बनावट संदेश पाठविण्यात आला होता. गॅस सेवा बंद होणार असल्याचे सांगून त्यामध्ये एक APK फाईल डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने ती फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करताच आरोपींनी मोबाईलवरील बँकिंगशी संबंधित गोपनीय माहितीवर प्रवेश मिळवून त्यांच्या खात्यातून ₹७० हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.
या तक्रारीच्या आधारे डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १००३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण, मोबाईल डेटा, आयपी लॉग, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला. तपासादरम्यान आरोपीचा माग काढत पोलीस पथकाने झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे जाऊन छापेमारी केली. त्यानंतर २६ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपी स्वतः बनावट APK फाईल विकसित करून त्या इतर सायबर गुन्हेगारांना विकत असल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी १० मोबाईल फोन, १ लॅपटॉप, ७ सिमकार्ड, ४ क्रेडिट/डेबिट कार्ड, ९६७ बनावट APK फाईल्स तसेच ३७ हजार २०० नागरिकांचा बँकिंग संदर्भातील गोपनीय डेटाबेस जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संवेदनशील माहिती आणि डिजिटल पुरावे जप्त झाल्याने देशभरात कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या मोठ्या जाळ्याचा उलगडा झाला आहे.
तपासादरम्यान आरोपीने तयार केलेल्या ९१ बनावट APK फाईल्स इतर सायबर गुन्हेगारांना विकल्याचेही उघड झाले आहे. या फाईल्सच्या माध्यमातून नागरिकांच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवून त्यांच्या बँक खात्यांची माहिती, ओटीपी, लॉगिन तपशील आणि इतर गोपनीय माहिती चोरून आर्थिक फसवणूक केली जात होती. त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात असलेल्या इतर साथीदारांचाही शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांच्या तपासानुसार या संपूर्ण सायबर नेटवर्कद्वारे देशभरातील २ हजार ९९३ नागरिकांची फसवणूक करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ५१२ नागरिकांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये मिळून ₹६३ कोटी ६९ लाख ६८ हजार १७४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आणखी काही गुन्हे या नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (दक्षिण प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त रागसुधा आर. (दक्षिण परिमंडळ-२) तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ (गिरगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक युवराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, पोलीस उपनिरीक्षक किरण देवरे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मोठे सायबर फसवणूक रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही कंपनीच्या नावाने आलेली APK फाईल, अज्ञात लिंक किंवा मोबाईल अॅप डाउनलोड करू नये. कोणतीही बँक, सरकारी संस्था किंवा महानगर गॅससारखी सेवा पुरविणारी कंपनी APK फाईल पाठवून माहिती मागवत नाही. अशा प्रकारचा संशयास्पद संदेश प्राप्त झाल्यास त्यावरील लिंक उघडू नये, कोणतीही माहिती भरू नये आणि तातडीने संबंधित बँक, कंपनी किंवा सायबर गुन्हे हेल्पलाइनकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
