जबरी चोरी आणि बस प्रवासातील चोऱ्या करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेचा दणका; ५२.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, २४ गुन्ह्यांची उकल

Satya Nirnaya
0

जबरी चोरी आणि बस प्रवासातील चोऱ्या करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेचा दणका; ५२.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे, दि. ८ जून : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या जबरी चोरी आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा घटक-१ ने मोठी कारवाई करत चार सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल ५२ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ३२ तोळे सोन्याचे दागिने, ५ मोटारसायकली, १ अग्निशस्त्र, १ जिवंत काडतूस आणि १ धारदार चाकू यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील एकूण २४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने विशेष मोहीम राबविली. अथक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पुरुष आणि दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौद सिराज खान ऊर्फ सौद काल्या (वय २५, कौसा, मुंब्रा) आणि स्वप्नील हरीश माधवानी ऊर्फ बाबू खरखट्या (वय २०, कळवा) यांचा समावेश आहे. तसेच बस प्रवासादरम्यान महिलांच्या पर्स व दागिने चोरणाऱ्या संगीता दशरथ पिठकर (वय ४५, मुलुंड पश्चिम) आणि सुरेखा बजरंग गायकवाड (वय ४७, मुलुंड पश्चिम) या दोन महिला आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान पुरुष आरोपींकडून ३२ तोळे सोन्याचे दागिने, ५ मोटारसायकली, एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला. आरोपींनी ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे परिसरात अनेक ठिकाणी चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

गुन्हे शाखेच्या तपासात सौद काल्या आणि स्वप्नील माधवानी यांच्याविरोधात कळवा, चितळसर, नारपोली, नौपाडा, रबाळे, टिळकनगर, मुंब्रा, ठाणे नगर, तुर्भे, उरण तसेच पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या एकूण १५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. यामध्ये जबरी चोरी, चोरी, घरफोडी तसेच शस्त्र बाळगल्याचे गुन्हे समाविष्ट आहेत.

विशेष म्हणजे, मुख्य आरोपी सौद सिराज खान याच्यावर यापूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात प्रोक्लेमेशन ऑर्डर जारी केली होती. अखेर गुन्हे शाखेने त्याला अटक करण्यात यश मिळविले.

दुसरीकडे महिला आरोपी संगीता पिठकर आणि सुरेखा गायकवाड यांच्याकडून कळवा, ठाणे नगर, राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या एकूण ९ चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या महिला आरोपी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या पर्स, मोबाईल आणि दागिन्यांवर हात साफ करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, शहरातील वाढत्या जबरी चोरी आणि बसमधील पाकिटमारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

या कारवाईमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने शहरातील सक्रिय चोरट्या टोळ्यांवर मोठा आघात केला असून, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)