लग्नाचे आमिष दाखवत महिलांची तब्बल ९० लाखांची फसवणूक, सराईत आरोपी जेरबंद
ठाणे, दि. ९ जून : मॅट्रिमोनियल संकेतस्थळांच्या माध्यमातून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, विवाहाचे आमिष दाखवत त्यांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या एका सराईत फसवणूक करणाऱ्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. देश-विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेक महिलांची तब्बल ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेश रविंद्र (वय ३७, रा. तेलंगणा) असे आहे. आरोपीने ‘Shaadi.com’ या मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून एका महिलेची ओळख करून घेतली. प्रेमाचे नाटक करत तिचा विश्वास संपादन केला आणि मंदिरात विवाहही केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याने महिलेकडून मोठी रक्कम उकळली.
फॉर्च्युनर कार खरेदीसह विविध कारणे पुढे करत आरोपीने फिर्यादी महिलेकडून सुमारे ४८ लाख रुपये घेतले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही रक्कम त्याने परदेशातील पब, हॉटेल आणि मौजमजेसाठी खर्च केली. पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने महिलेसोबतच्या खासगी क्षणांचे मोबाईलवर चित्रीकरण केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३००/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये ११ मे २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीविरोधात तेलंगणा राज्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. तेथेही त्याने एका महिलेशी विवाह करून तिचे शारीरिक शोषण केले आणि तिच्याकडून सुमारे १५ लाख रुपये उकळले. याशिवाय त्या महिलेच्या परिचितांना युरोपमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत आणखी १८ लाख रुपये घेतले. अशाप्रकारे तेलंगणामध्ये एकूण ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथेही आणखी एका महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच इतर महिलांशीही मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवरून संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आरोपीच्या फसवणुकीचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
तांत्रिक तपासादरम्यान आरोपी रशियात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात तात्काळ ‘लुक आऊट सर्क्युलर’ (एलओसी) जारी करण्यात आले. १ जून २०२६ रोजी तो रशियाहून नवी दिल्ली विमानतळावर दाखल होताच इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कासारवडवली पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
सखोल चौकशीनंतर २ जून २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने फिर्यादी महिलेसह आणखी चार महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आणखी काही महिला या टोळीच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अशा प्रकारे फसवणूक झालेल्या महिलांनी कासारवडवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळांद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अशोक दुधे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ प्रशांत कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोळ्हटकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार सरनाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष पोटे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले. या कारवाईमुळे आणखी अनेक महिलांची फसवणूक होण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
