अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; ३.०३ कोटींचा चरस व ट्रामाडोल कॅप्सूल जप्त
ठाणे, दि. १० जून : ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अमली पदार्थ तस्करीविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ३ लाख ६४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ३ किलो २० ग्रॅम वजनाचा चरस, ट्रामाडोलच्या १२ हजार ९८४ कॅप्सूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील दोन आरोपींसह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन वेळा शिक्षा भोगलेला असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक डुंबळवाड, राजेंद्र निकम आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला.
दि. ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजता खारेगाव टोलनाका परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुजरातमधील अंकलेश्वर येथील रहिवासी फिरोज अब्दुल खान (वय ५२) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून ३ किलो २० ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला. या चरसाची किंमत सुमारे ३ कोटी २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय स्पास्मो-प्रॉक्सीव्हॉन आर प्लस (ट्रामाडोल) या औषधाच्या १२ हजार ९८४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत १ लाख ४८ हजार ५०४ रुपये इतकी आहे. रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेटसह इतर साहित्यही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५५/२०२६ दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(२)(क), २१(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील करीत आहेत.
तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासादरम्यान या रॅकेटमधील आणखी दोन आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेडा (वय ४२), रा. शमशीपुरा, बिजबेहरा, अनंतनाग, जम्मू-काश्मीर याला दि. १९ मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दुसरा आरोपी शौकत अझीझ मीर उर्फ जुबेर, रा. देवरा लोलाब, कुपवाडा, जम्मू-काश्मीर याला दि. ६ जून रोजी जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील कुपवाडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
या आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर ठाण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला दि. १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी फिरोज अब्दुल खान याचीही पुन्हा पोलीस कोठडी घेऊन तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपींनी मोठ्या प्रमाणात चरस आणि ट्रामाडोल कॅप्सूलची तस्करी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हा चरस जम्मू-काश्मीरमधून आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याचा पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
मुख्य आरोपी फिरोज अब्दुल खान याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सन २००८ मध्ये एनसीबी हिम्मतनगर, अहमदाबाद येथे आणि सन २०१७ मध्ये एनसीबी जम्मू येथे नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकरणांत त्याने शिक्षा भोगली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई सहपोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक डुंबळवाड, राजेंद्र निकम, पोलीस हवालदार अमोल देसाई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन ही गंभीर गुन्हेगारी कृत्ये असून अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर व्यवहाराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
