शहापुरात घोंगडी बैठक’ ठरली लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श
शहापूर, दि. ६ : शासकीय कार्यालये, फाईलींचे ढीग आणि अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच प्रशासन मर्यादित राहते, अशी सर्वसामान्यांची धारणा असताना ठाणे जिल्हा प्रशासनाने शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात राबविलेल्या ‘घोंगडी बैठकी’मुळे प्रशासनाचा एक वेगळाच चेहरा नागरिकांना अनुभवायला मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या पुढाकारातून शहापूरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात रात्रीच्या वेळी ‘घोंगडी बैठक’ आयोजित करण्यात आली. दिवसभर शेतीची कामे उरकून गावकरी एका ठिकाणी जमले असताना प्रशासन थेट त्यांच्या दारी पोहोचले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी पारंपरिक ढोल-ताशे, नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे स्वागत केले. कोणताही बडेजाव किंवा व्हीआयपी संस्कृती न ठेवता जिल्हाधिकारी आणि अधिकारी मंडळी ग्रामस्थांसमवेत साध्या घोंगडीवर बसली. एका साध्या बल्बच्या उजेडात सुरू झालेला हा संवाद केवळ शासकीय औपचारिकता नसून प्रशासन आणि जनतेमधील विश्वास दृढ करणारा ठरला.
या बैठकीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आणि अपेक्षा घेऊन नागरिक, महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खराब रस्ते, वीजपुरवठा, वनहक्क दावे, शासकीय योजनांचा लाभ, जमीनविषयक अडचणी तसेच स्थानिक विकासकामांशी संबंधित अनेक प्रश्न ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रत्येक विषयाची बारकाईने नोंद घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. कार्यालयात बसून फाईलींमधून प्रश्न समजून घेण्यापेक्षा गावात जाऊन लोकांचे वास्तव जाणून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशा बैठका लोकशाही अधिक मजबूत करतात आणि प्रशासन व जनतेतील दरी कमी करतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घोंगडी बैठकीमुळे अधिकारी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक खुला झाला असून परस्पर विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. अपेक्षा, कृती आणि समन्वयातून विकासाचा मार्ग अधिक सुलभ होतो, हे या उपक्रमातून दिसून आले. हा केवळ एका अधिकाऱ्याचा उपक्रम नसून ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक संवेदनशीलतेचे आणि उत्कृष्ट टीमवर्कचे उदाहरण ठरले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ, उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांमध्ये बसून त्यांच्या समस्या ऐकत होते. याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. ‘प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे’, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या बैठकीतून करण्यात आला.
या उपक्रमाचे प्रसारमाध्यमांनीही स्वागत केले असून संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श म्हणून त्याची प्रशंसा केली आहे. फाईलींतील आकडे आणि कागदपत्रांपेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील भावना आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणे हेच खऱ्या प्रशासनाचे लक्षण असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
“आजवर आम्ही साहेबांना भेटण्यासाठी शहरात जाऊन तासनतास रांगेत उभे राहत होतो. मात्र आज जिल्हाधिकारी स्वतः आमच्या गावात येऊन आमच्या घोंगडीवर बसले आणि आमच्या समस्या ऐकल्या,” अशी भावना एका ज्येष्ठ ग्रामस्थाने व्यक्त केली.
विशेष म्हणजे या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह अधिकारी वर्गाने डोळखांब गावात मुक्काम करून स्थानिक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. विकास प्रक्रियेत शेवटच्या घटकाचा सहभाग वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील ही ‘घोंगडी बैठक’ केवळ एका रात्रीपुरती मर्यादित नसून लोकाभिमुख प्रशासनाचा ‘ठाणे पॅटर्न’ म्हणून राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करून विश्वास, संवेदनशीलता आणि विकासाचा नवा मार्ग दाखविणारा हा उपक्रम भविष्यात राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


