सीईआयआर प्रणालीचा प्रभावी वापर; परिमंडळ-१ मधील कळवा, मुंब्रा, डायघर, राबोडी, ठाणेनगर व नौपाडा परिसरातील नागरिकांना दिलासा
सत्य निर्णय प्रतिनिधी : ठाणे
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सन २०२५ ते सन २०२६ या कालावधीत गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे शाखा घटक क्रमांक-१च्या पथकाने तांत्रिक तपास आणि सीईआयआर (CEIR) प्रणालीच्या मदतीने तब्बल ३५ मोबाईल फोन हस्तगत केले असून, या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ४० हजार रुपये आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ अंतर्गत कळवा, मुंब्रा, डायघर, राबोडी, ठाणेनगर आणि नौपाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील दोन वर्षांत नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी उपलब्ध तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखा घटक-१च्या पथकाने गहाळ मोबाईल फोनबाबतची माहिती संकलित करून त्यांचे तांत्रिक तपशील तपासण्यास सुरुवात केली. मोबाईलचा आयएमईआय क्रमांक तसेच सीईआयआर प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मोबाईल फोनचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान गहाळ झालेल्या मोबाईल फोनपैकी अनेक मोबाईल विविध ठिकाणी वापरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित मोबाईल फोनचा शोध घेऊन पोलिसांनी एकूण ३५ मोबाईल फोन हस्तगत केले. या मोबाईलची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे परत करण्याची पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.
मोबाईल फोन गहाळ झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तसेच मोबाईलचा आयएमईआय क्रमांक उपलब्ध असल्यास त्याच्या आधारे तपास करणे पोलिसांना अधिक सोपे होते. केंद्र सरकारच्या सीईआयआर प्रणालीच्या माध्यमातून गहाळ किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा वापर रोखण्यासोबतच त्याचा शोध घेण्यास मदत होते. ठाणे पोलिसांनी या प्रणालीचा प्रभावी वापर करून ३५ मोबाईल हस्तगत केल्याने संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस सहआयुक्त, गुन्हे श्री. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त, गुन्हे श्री. अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये गुन्हे शाखा घटक-१चे वपोनि श्री. अनिल शिंदे, पोनि वालझाडे, मपोनि चित्रा चौधरी, पोउनि शिरसाठ, सुभाष मोरे, ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, सुनील माने, उज्वला कुबल तसेच पोलीस अंमलदार नागराज सोनकडे, अविनाश पाटील, संदीप महाडिक, व्यंकट धायगुडे, शेखर तडवी, शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, दीपक जाधव, मुकुंद आव्हाड, गणेश बडगुजर, शशिकांत सावंत, मलिका बहिरम, दिपाली जाधव, पोलीस नाईक निष्कीकांत पाटील, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, अमोल ढवरे, मयूर लोखंडे आणि सागर सुरळकर यांनी सहभाग घेतला.
तंत्रज्ञानाच्या मदतीने गहाळ मोबाईलचा शोध
गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तपासामध्ये किती महत्त्वाचा ठरतो, हे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्यास विलंब न करता पोलीस ठाण्यात तक्रार करून मोबाईलचा आयएमईआय क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती पोलिसांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे पोलिसांकडून गहाळ तसेच चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासाची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांच्या मौल्यवान वस्तू परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
