सत्य निर्णय प्रतिनिधी मुंबई
मुंबई, : कफ परेड, कफ परेड पोलीस ठाणे हद्दीत कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकाची तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यात कफ परेड पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपी अनिकेत बळीराम गायकवाड, वय २४ वर्षे, राठी दुसरा माळा, गणेश हाईट बिल्डिंग, दत्तनगर, आंबेगाव, पुणे, याला दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती, त्या खात्याचा धारक रोहित रावत यालाही बारामती येथून ताब्यात घेण्यात आले होते.
कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८, ४, ३१९, २, ३, ५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६, सी आणि ६६, डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी अखिलेश कुमार सिंग, वय ४४ वर्षे, रूम क्रमांक ९६, १२, नेव्ही नगर, सुविधा गेट, विजय चौक, कफ परेड, मुंबई, ०५, यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१ जून २०२६ रोजी फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल क्रमांक ९३६६४८९८९१ वरून त्यांच्याशी संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने आपण डीटीडीसी कुरिअर कंपनीमध्ये कर्मचारी असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने असलेले कुरिअर पार्सल दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर गेले असून, त्याचा पत्ता बदलण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या व्हाट्सअपवर एक लिंक पाठवली. या लिंकवर जाऊन आवश्यक गोपनीय माहिती भरण्यास फिर्यादी यांना प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मोबाईलवर आरटीओ ई, चालान, एपीके नावाची फाईल पाठवली. सदर फाईलच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या मोबाईलचा बेकायदेशीरपणे एक्सेस मिळवण्यात आल्याचा पोलिसांचा तपास आहे.
मोबाईलचा एक्सेस मिळाल्यानंतर आरोपीने लबाडीच्या इराद्याने फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून दोन व्यवहारांच्या माध्यमातून एकूण २ लाख ७० हजार रुपये वळते केले. आपल्या बँक खात्यातून रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी फिर्यादी यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती, ते खाते रोहित रावत नामक इसमाच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध माहितीच्या आधारे रोहित रावत याचा शोध घेतला.
कफ परेड सायबर शाखेच्या पथकाने तांत्रिक मदतीच्या सहाय्याने रोहित रावत याला बारामती येथून ताब्यात घेतले. त्याला कफ परेड पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान रोहित रावत याने त्याचे बँक खाते अनिकेत नामक इसमास वापरण्यास दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनिकेत नामक इसमाचा शोध सुरू केला. सदर इसम पुणे येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी कफ परेड पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना झाले. गुप्त माहितीदारांच्या मदतीने अनिकेत बळीराम गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी कफ परेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
अनिकेत याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे एक मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी सदर मोबाईलचे निरीक्षण केले असता त्यामध्ये विविध इसमांच्या बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. तसेच या कागदपत्रांची इतर इसमांसोबत देवाणघेवाण झाल्याचेही तपासात समोर आले आहे. या बाबत पोलिसांनी अनिकेत याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचा सदर सायबर फसवणूक प्रकरणातील सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने अनिकेत बळीराम गायकवाड याला कायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईसाठी दक्षिण परिमंडळ, १ चे मा. पोलीस उपायुक्त, कुलाबा विभागाचे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड तसेच गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र काळे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरसे हे सायबर तपासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच पोलीस हवालदार अनिल उदागे, पोलीस शिपाई अमर देशमुख आणि पोलीस शिपाई वसीम शेख यांनी तपासात सहकार्य केले.
कुरिअर पार्सल, आरटीओ ई, चालान किंवा अन्य शासकीय प्रक्रियेच्या नावाखाली मोबाईलवर पाठवण्यात येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके फाईल डाउनलोड करू नयेत, तसेच कोणतीही गोपनीय बँकिंग माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात
