परवान्याशिवाय विदेशी दारू विक्रीवर राबोडी पोलिसांची धडक कारवाई :

Satya Nirnaya
0

परवान्याशिवाय विदेशी दारू विक्रीवर राबोडी पोलिसांची धडक कारवाई; सुमारे ₹१.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

 ठाणे :  ठाण्यातील माजीवाडा परिसरातील बॉम्बे डोअर रेस्टो बार येथे परवान्याशिवाय विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबोडी पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ₹१,२८,७०५ रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय सी. महाजन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, माजीवाडा उड्डाणपुलाजवळील बॉम्बे डोअर रेस्टो बारमध्ये आवश्यक शासकीय परवाना नसतानाही विदेशी दारूची विक्री केली जात आहे. तसेच, या ठिकाणी ग्राहकांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.

या माहितीची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश गावंड, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक डाके तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत संबंधित रेस्टो बारवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रथम हॉटेल व्यवस्थापकाकडे विदेशी दारू विक्रीचा वैध परवाना मागितला. मात्र, व्यवस्थापकाला कोणताही वैध परवाना सादर करता आला नाही. त्यानंतर पंचांसमक्ष बारच्या काऊंटरची तसेच मागील साठवणूक विभागाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या.

या कारवाईत एकूण ₹१,२८,७०५ किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मद्यामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश असून त्याचा पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलीस शिपाई रोकडे यांच्या फिर्यादीवरून राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(ई), ६८ आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना निष्पन्न केले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

१) अंकित दिनेश त्रिपाठी (वय २८ वर्षे) – बॉम्बे डोअर रेस्टो बारच्या स्टाफ रूममध्ये वास्तव्यास.

२) प्रदीप मेवालाल तिवारी (वय ३३ वर्षे).

३) शेखर चव्हाण – रा. दोस्ती अपार्टमेंट, बाळकुम, ठाणे.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात परवान्याशिवाय विदेशी मद्यसाठा ठेवून त्याची विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय या व्यवसायामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. संबंधित परवाने, आर्थिक व्यवहार, मद्यसाठ्याचा पुरवठा आणि इतर कागदपत्रांचीही चौकशी सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ–१) बाळासाहेब पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव (नौपाडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश गावंड, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक डाके तसेच पोलीस कर्मचारी सावंत, रोकडे, पठाड, पवार, कोळी आणि राबोडी पोलीस ठाण्याच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ठाणे शहरात बेकायदेशीर मद्यविक्री आणि परवान्याविना सुरू असलेल्या व्यावसायिक आस्थापनांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)