जोगेश्वरीतून पत्नीचा गळा चिरून खून; पतीला अवघ्या काही तासांत ओशिवरा पोलिसांकडून अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर, अॅस्टर बिल्डिंगसमोर, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे एक महिला गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षामार्फत ओशिवरा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ओशिवरा बीट मार्शलवरील पोलीस शिपाई आकाश बागल यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित महिला गंभीर जखमी अवस्थेत पडलेली होती. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना महिलेचे नाव झुमरी धीरज पवार (वय अंदाजे ३५ वर्षे) असल्याचे सांगितले. तसेच तिच्या पतीनेच धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.
जखमी महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पोलीस शिपाई आकाश बागल यांनी तात्काळ तिला ओशिवरा निर्भया वाहनातून उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत मृत महिला झुमरी धीरज पवार हिचा तिचा पती धीरज कलेक्टर पवार (वय ३६ वर्षे) याच्याशी किरकोळ कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या रागातून आरोपीने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच ओशिवरा पोलिसांनी विविध तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक माहिती, स्थानिक सूत्रे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर १५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.२० वाजता आरोपी धीरज कलेक्टर पवार याला बेहरामबाग परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी धीरज पवार हा मजुरीचे काम करीत असून तो आदर्श नगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू असून खुनामागील नेमके कारण, पूर्वीचे कौटुंबिक वाद तसेच इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पुढील पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब, तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक मजबूत करण्यात येत आहे.
ही संपूर्ण कारवाई ओशिवरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक तसेच पोलीस शिपाई आकाश बागल आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.
कौटुंबिक वादाचे रूपांतर इतक्या भीषण गुन्ह्यात झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणताही कौटुंबिक वाद हिंसाचाराकडे न नेता कायदेशीर मार्गाने सोडविण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाचा पुढील तपास ओशिवरा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
