मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; आठ दुचाकींसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Satya Nirnaya
0

कासारवडवली पोलीस स्टेशनची मोठी कारवाई आठ दुचाकींसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

                        प्रतिनिधी  : ठाणे

ठाणे, दि. १५ जून : कासारवडवली पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या आठ मोटारसायकली, सहा मोबाईल फोन, एक टॅब, १४ सिमकार्ड, इलेक्ट्रिक फ्यूजसह सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेले आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गेल्या दोन महिन्यांत हिरानंदानी इस्टेट परिसरातून रस्त्यालगत पार्क केलेल्या रॉयल एनफिल्ड हंटर आणि सुझुकी बर्गमन या मोटारसायकलींच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलिसांचे तपास पथक कामाला लागले.

तपासादरम्यान पोलिसांनी हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, मिरारोड, दहिसर, कांदिवली, अंधेरी आणि सांताक्रूझ परिसरातील सुमारे १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गोपनीय माहितीच्या आधारे ७ मे २०२६ रोजी सांताक्रूझ येथे चोरीची सुझुकी बर्गमन विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सोहेल अब्दुल शेख (वय २१, सांताक्रूझ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आणि चौकशीत आणखी तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

पुढील तपासात या टोळीचा सूत्रधार मिलिंद मनोहर सावंत (वय ३०, कांदिवली) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मुंबई, मिरारोड, कणकवली, वेंगुर्ले, देवगड तसेच बेंगळुरू येथे शोध घेण्यात आला. अखेर ९ जून रोजी दहिसर परिसरातून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदार भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी (वय ४६, नालासोपारा) याच्या मदतीने कासारवडवली परिसरातून नऊ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर भूषण पुरीलाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपींची चोरीची पद्धतही उघड झाली आहे. रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या केलेल्या रॉयल एनफिल्ड हंटर आणि सुझुकी बर्गमन मोटारसायकली आरोपी प्रथम काही अंतरावर ढकलून नेत असत. त्यानंतर वायर कापून इलेक्ट्रिक फ्यूजच्या साहाय्याने वाहन सुरू करून चोरी करत असत. चोरीनंतर मोटारसायकल काही दिवस मिरारोड रेल्वे परिसरात लपवून ठेवली जात असे. वाहनाचा शोध कोणी घेत नसल्याची खात्री झाल्यानंतर ‘एम परिवहन’ अॅपद्वारे वाहनधारकाची माहिती मिळवून बनावट नंबर प्लेट तयार केली जात होती. त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून कमी किमतीत मोटारसायकलींची विक्री करण्यात येत होती. ग्राहकांना कागदपत्रे देण्याचे आश्वासन देऊन आरोपी मोबाईल क्रमांक बंद करत असल्याचेही तपासात उघड झाले.

या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या आठ मोटारसायकलींमध्ये चार रॉयल एनफिल्ड हंटर आणि चार सुझुकी बर्गमन वाहनांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे आठ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय सहा मोबाईल फोन, एक टॅब, १४ सिमकार्ड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी मिलिंद सावंत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटारसायकल चोरीचे सुमारे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी मुंबई गुन्हे प्रकटीकरण कक्षाने त्याला अटक करून अनेक गुन्ह्यांची उकल केली होती. त्याला न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली होती.

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोळवटकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक मनीष पोटे, उपनिरीक्षक नितीन हांगे, सुनील सूर्यवंशी तसेच पोलीस अंमलदार मनोज सकपाळ, जगदीश पवार, रविंद्र राऊत, गोरखनाथ काळे, शरद माळी, संदीप तुपे, किशोर माळी आणि काळूराम साठे यांनी पार पाडली.

दरम्यान, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत, हँडल लॉक व अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन कासारवडवली पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)