नशेसाठी कोडीन फॉस्फेटयुक्त सिरपचा साठा जप्त :चार जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई,
मुंबई, दि. १३ जून : मुंबई गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण शाखा-१ अंतर्गत गुन्हे प्रतिबंधक शाखा, कक्ष-११ (कांदिवली) यांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन फॉस्फेटयुक्त सिरपच्या तब्बल ४ हजार ७३४ बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात तीन प्रौढ आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस), १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान अमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मिळून ५३ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-११ चे पथक १३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मालाड पश्चिम परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी एस. व्ही. रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोरील रजियादेवी गजानंद गुप्ता जलतृप्ती केंद्राजवळ चार जण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून नशेसाठी विक्रीस आणलेल्या कोडीन फॉस्फेटयुक्त सिरपच्या एकूण १५३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. चौकशीत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये दोन २६ वर्षीय तरुण, एक २३ वर्षीय तरुण आणि एक १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिस शिपाई नरेश वराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०३७/२०२६ नोंदविण्यात आला. एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करून गुन्हे प्रतिबंधक शाखा, कक्ष-११ यांनी पुढील तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, आरोपींपैकी एका व्यक्तीने नवी मुंबईतील खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात कोडीन फॉस्फेटयुक्त सिरपचा साठा करून ठेवल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता आरोपीला सोबत घेऊन खारघर येथे धाड टाकली.
खारघरमधील ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांना मोठा साठा आढळून आला. तेथून पोलिसांनी आणखी ४ हजार ५८१ बाटल्या जप्त केल्या. त्यामुळे मालाड येथील १५३ बाटल्या आणि खारघर येथील ४ हजार ५८१ बाटल्या अशा मिळून एकूण ४ हजार ७३४ कोडीन फॉस्फेटयुक्त सिरपच्या बाटल्या पोलिसांच्या हाती लागल्या. या संपूर्ण अमली पदार्थांच्या साठ्याची बाजारातील किंमत ५२ लाख ७ हजार ४०० रुपये इतकी असल्याचे तपासात समोर आले आहे.
याशिवाय, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली १ लाख रुपयांची मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५३ लाख ७ हजार ४०० रुपये इतकी झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या सिरपचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली असून, या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-११ कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे. अल्पवयीन मुलांचाही या प्रकारात वापर होत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांकडून पुरवठा साखळी, सिरपचा मूळ स्रोत आणि यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही यशस्वी कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण-उत्तर) माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कक्ष-११, गुन्हे प्रतिबंधक शाखा, कांदिवली येथील पोलीस निरीक्षक गणेश माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस निरीक्षक रघुनाथ पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलोफर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब बनसोडे, अमित पाटील तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे प्रतिबंधक शाखा, कक्ष-११ कडून सुरू असून, या अमली पदार्थांच्या साखळीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके काम करत आहेत.


