सत्य निर्णय नागपूर प्रतिनिधी
नागपूर, दि. ३० मे २०२६ – नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा रचून मंडळ अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या फेरफार (म्युटेशन) कामासाठी महसूल विभागाकडे अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी प्रवीण हरगोविंद मेश्राम (वय ४७) यांनी एकूण ७५,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
यापैकी १२ मे २०२६ रोजी ५०,००० रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित २५,००० रुपयांसाठी त्यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला. यामुळे तक्रारदाराने नागपूर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये मंडळ अधिकारी प्रवीण मेश्राम यांनी फेरफाराच्या कामाच्या मोबदल्यात २५,००० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
