मुंबईत ६१ लाखांचा कोकेनसाठा जप्त; नायजेरियन व्यक्तीला अटक

Satya Nirnaya
0

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटची कारवाई

   

          सत्य निर्णय प्रतिनिधी : मुंबई

 मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांच्या वरळी युनिटच्या पथकाने मुंबईतील नशेच्या पदार्थांची खरेदी-विक्री, पुरवठा व साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ६१ लाख रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटचे पथक मुंबई शहरातील अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १२२ ग्रॅम कोकेन आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या कोकेनची अंदाजे किंमत ६१,००,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. तसेच ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७७/२०२६ यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट, १९८५ मधील कलम ८(क) सह २१(क) तसेच इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ मधील संबंधित कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष पौर्णिमा चौगुले-शृंगी, सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित साळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांच्याकडून सुरू आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)