खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत वाहनचोर अटकेत ९ दुचाकींसह ₹६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सत्य निर्णय प्रतिनिधी कल्याण
कल्याण : शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीने खडकपाडा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या २४ तासांत एका सराईत वाहनचोराला जेरबंद केले आहे. आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या एकूण ९ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹६ लाख ३५ हजार इतकी आहे. या कारवाईमुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी गांधारी येथील महानगरपालिका डम्पिंगजवळील वडवली रोड परिसरातून होंडा सीबी शाईन (क्रमांक MH-05-BX-1296) ही मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच खडकपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी अब्बास शाहजोर सय्यद (वय २५, रा. मलंगनगर, अटाळी रोड, आबिवली, कल्याण पश्चिम) याला शिताफीने अटक केली.
आरोपीकडून सुरुवातीला चोरीस गेलेली होंडा सीबी शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी ९ दुचाकी वाहने जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये सुजुकी बर्गमन, सुजुकी अॅक्सेस, टीव्हीएस एनटॉर्क, टीव्हीएस अपाची, होंडा सीबी शाईन यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. ही वाहने इंटरमिजिएट (ठाणे), डोंबिवली, विष्णूनगर, मुंब्रा, महात्मा फुले चौक, कळवा, अंबरनाथ, पेन आणि खडकपाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेली होती.
या कारवाईमुळे एकूण ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून इतरही काही गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तपासादरम्यान आरोपी हा केवळ वाहनचोरीपुरता मर्यादित नसून त्याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे, जबरी चोरी तसेच इतर मालमत्तेविषयक गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच तो कापूरबावडी आणि बदलापूर पोलीस ठाण्यातील काही गुन्ह्यांमध्येही वाँटेड आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आरोपीकडून आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे.
खडकपाडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आघात झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. वाहनचोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती यांचा प्रभावी वापर करून पोलिसांनी अल्पावधीत मोठे यश संपादन केले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ श्री. अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रेमनाथ बोले, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मारुती आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ही यशस्वी कारवाई केली.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा वेगाने तपास करून अल्पावधीत आरोपीला अटक करत मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल खडकपाडा पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

