एटीएममध्ये प्लास्टिक पट्टी लावून ग्राहकांची लाखोंची फसवणूक; भांडुप पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश, मुख्य आरोपी अटकेत

Satya Nirnaya
0

बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई; मोटारसायकल, मोबाईल, चोरीची रोकडसह १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन महिलांसह इतर साथीदारांचाही सहभाग उघड

  सत्य निर्णय मुंबई | प्रतिनिधी

 मुंबई : भांडुप परिसरात एटीएम मशीनमध्ये प्लास्टिकची पट्टी बसवून ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या खात्यातील रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, मोबाईल फोन, प्लास्टिकची पट्टी आणि चोरीची रोकड असा एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन महिलांसह इतर साथीदारांचाही सहभाग निष्पन्न झाला असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

बँक ऑफ बडोदा, भांडुप शाखेच्या व्यवस्थापक श्रीमती ऋचा अरुण श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचदेव कॉम्प्लेक्स येथील एटीएम मशीनमध्ये अज्ञात आरोपींनी प्लास्टिकची पट्टी बसवून मशीनमध्ये छेडछाड केली होती. त्यामुळे ग्राहकांनी पैसे काढण्याचा व्यवहार केल्यानंतर त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश मोबाईलवर येत होता, मात्र प्रत्यक्षात रोकड मशीनमधून बाहेर येत नव्हती.

बँकेकडे अशा स्वरूपाच्या सलग पाच तक्रारी आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता आरोपी ग्राहक येण्यापूर्वीच एटीएम मशीनमध्ये प्लास्टिकची पट्टी बसवत असल्याचे स्पष्ट झाले. ग्राहक निघून गेल्यानंतर आरोपी पुन्हा एटीएममध्ये येऊन मशीनमध्ये अडकलेली रोकड काढून घेऊन जात असल्याचेही तपासात समोर आले.

सलग दोन दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. या टोळीत दोन पुरुष आणि दोन महिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद जियाद उर्फ अयान इर्शाद अहमद (वय २१) याला भांडुप परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.

तपासादरम्यान आरिफा अजीम दुकानदार (वय ४५) आणि नमीरा अजीम दुकानदार (वय २४) या दोन महिलांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

आरोपींकडून ८० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, प्लास्टिकची पट्टी, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ३९ हजार ५०० रुपयांची चोरीची रोकड असा एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने तसेच तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, एटीएममधून पैसे काढताना मशीनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा छेडछाड दिसल्यास तात्काळ संबंधित बँक आणि पोलिसांना माहिती द्यावी. व्यवहार यशस्वी झाल्याचा संदेश आला, मात्र प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत, तर विलंब न करता त्वरित बँकेशी व जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)